'या' सिनेमाने प्रभावित झालो, पण अपेक्षांचा भार वाढला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'या' सिनेमाने प्रभावित झालो, पण अपेक्षांचा भार वाढला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका खास मुलाखतीसाठी भेट घेतली. ही मुलाखत ‘फिक्की’ च्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळा संवाद झाला. अक्षयने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले, “राजकारणातील तुम्ही एक स्टार आहात, पण असा कोणता सिनेमा किंवा कलाकार आहे ज्याचा तुमच्यावर परिणाम झाला आहे?” यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सिनेमा हा केवळ करमणूक नसून तो मानवी भावना आणि संवेदना यांना आकार देतो. अनेक चित्रपटांनी मला प्रभावित केलं आहे, मात्र एक चित्रपट आहे ज्याचा उल्लेख करावाच लागेल तो चित्रपट म्हणजे अनिल कपूरचा 'नायक'.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, नायक मध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या एका दिवसात अनेक बदल घडवून आणतो. त्यामुळे आजही जेव्हा मी जनतेमध्ये जातो, तेव्हा लोक सांगतात, 'तुम्हीही नायकसारखं काम करा.' लोकांच्या डोक्यात ‘नायक’चं एक बेंचमार्क सेट झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी हसत हसत एक किस्साही सांगितला. “एकदा अनिल कपूर भेटले तेव्हा मी त्यांना म्हटलं 'का बनवलात नायक सिनेमा?' लोकांना वाटायला लागलं, 'तो नायक आणि आम्ही नालायक!' एका दिवसात इतकी कामं करणं शक्य नसतं, पण या चित्रपटाने जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या,” असं ते म्हणाले.

राजकारणात दीर्घकाळ काम करताना संवेदना बोथट होण्याचा धोका असतो, मात्र काही चित्रपट अशा भावना जिवंत ठेवतात, असं मत मुख्यमंत्री  फडणवीसांनी व्यक्त केलं. “असे चित्रपट पाहिल्यावर मी पुन्हा एकदा तोच सर्वसामान्य माणूस होतो, जो मी सुरुवातीपासून आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुलाखतीदरम्यान, अक्षयने हलकाफुलका पद्धतीने एक प्रश्न विचारत मुख्यमंत्री फडणवीसांचा मूड खुलवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खातात, हे विचारून चर्चेत आलेल्या अक्षयने मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं, “तुम्ही नागपूरचे आहात, संत्रं कसं खाता?” यावर मिश्किल उत्तर देताना मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, “संत्र्याचे दोन तुकडे करा, त्यावर थोडं तिखट - मीठ लावा आणि आंब्यासारखं चोखून खा!”