शिवसेना नाव अन् धनुष्यबाणावरचा निकाल पुन्हा रखडला ; 'या' तारखेला होणार सुनावणी

शिवसेना नाव अन् धनुष्यबाणावरचा निकाल पुन्हा रखडला ; 'या' तारखेला होणार सुनावणी

मुंबई - शिवसेनेतील पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज होणार होती; मात्र ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. दोन्ही गटांना प्रत्येकी तीन तास युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि चिन्हाबाबतचा अंतिम निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर ठाकरे गटाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘मशाल’ या चिन्हावर निवडणुका लढवल्या. शिवसेना नाव व चिन्हावरचा निर्णय येणे अद्याप बाकी असतानाच, महायुतीतील घटक पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान राखावा, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच दिले आहेत. आत्मसन्मान राखला गेला तर महायुती म्हणून विचार होईल; अन्यथा स्वबळावर लढण्याचे किंवा इतर पर्याय खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.