योग प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनेल - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार 21 जून रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल यासाठी प्रभावी आणि यशस्वी नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठकीत दिल्या. तसेच, त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींना योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘शालेय स्तरावर योग दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक शिक्षक सहभागी होणार असून, समाजकल्याण विभागासह इतर सर्व विभागांच्या शाळा आणि आश्रमशाळांचा यात समावेश असेल. सर्व शाळांची नोंदणी अनिवार्य आहे. शहरी भागातील खासगी शाळांसह जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर सर्व माध्यमांच्या शाळांचा सहभाग बंधनकारक आहे.’ त्यांनी माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने येत्या दोन दिवसांत आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या.
गाव - खेड्यांपासून ते वाडी - वस्त्यांपर्यंत योग दिनाचे आयोजन करा, असे सांगून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याचे निर्देश दिले. डिजिटल शिक्षणाचे शिक्षक ‘लाइव्ह योगा’ चे आयोजन करतील, यासाठी व्हिडीओ लिंक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसामुळे अडथळा येऊ नये म्हणून निवाऱ्यात योग करण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यानंतरचा पहिला शनिवार योगायुक्त करण्याचा संदेशही त्यांनी दिला. ज्या भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, तिथे योगाचे व्हिडीओ आधीच डाउनलोड करून ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले, ‘योग दिनाच्या माध्यमातून जागतिक विक्रम नोंदविण्याची संधी आहे. मात्र, विक्रमासाठी योग न करता, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी प्रत्येक शाळेने प्रथम नोंदणी करावी. योग शिक्षकांची नियुक्ती आणि व्हिडीओ सादरीकरण याबाबत नियोजन करावे. 21 जून रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत योग प्रात्यक्षिके घ्यावीत. प्रत्येक शाळेने कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ तयार करावेत. केंद्र प्रमुखांनी मोबाइल किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावर नियंत्रण ठेवावे.’
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी सांगितले, 21 जून रोजी सर्व शाळांमध्ये 45 मिनिटांचे योग प्रात्यक्षिक होणार असून, त्यात सात लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ सहभागी होतील. 190 केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत हे आयोजन होणार आहे. ज्या शाळांमध्ये योग शिक्षक उपलब्ध नाहीत, तिथे व्हिडीओद्वारे प्रात्यक्षिके करावीत. शाळांमध्ये केलेल्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात जागतिक विक्रमाची संधी -
प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि शासकीय विभागांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकाच वेळी योग दिन साजरा केल्यास कोल्हापुरात जागतिक विक्रम नोंदवण्याची संधी आहे. सहभागी यंत्रणांकडून याबाबत अहवाल घेऊन त्याच दिवशी याची माहिती तयार केली जाईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर तसेच व्हीसी द्वारे सर्व तालुका शिक्षणाधिकारी उपस्थित होते.