राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत 'या' नवख्या चेहऱ्याला संधी,एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र

राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत 'या' नवख्या चेहऱ्याला संधी,एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा रंगत असतानाच अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे अंदाज चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ज्योती वाघमारे यांना निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शिवसेनेकडून रोहित टिळक यांना देखील फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर भाजपने चार उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, रोहित टिळक आणि शायना एन.सी. या चार नावांवर चर्चा सुरू होती. यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र अखेर पक्षाने ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हा निर्णय शिंदे यांच्या ‘धक्कातंत्रा’चा भाग मानला जात असून पक्षात नव्या नेतृत्वाला वाव देण्याचा संदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान,  राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे दोन उमेदवार उभे करणार आहेत. पहिल्या उमेदवार सोलापूर येथील पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आहेत, ज्या दलित समाजाच्या आहेत. तर दुसरे उमेदवार रोहित टिळक आहेत, जे पुण्यातील काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. शिंदे यांना राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी 9 मतांची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या उमेदवाराचा सामना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या विद्यमान संख्याबळानुसार तीन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र चौथी जागा जिंकण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गटातील अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. भाजपने विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.