राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने पंढरपूर यात्रा मार्गावर जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने या निर्णयासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत असणार आहेत आज पासून म्हणजेच 3 जुलै पासून ते २१ जुलै पर्यंत वारकऱ्यांसाठी टोल माफी केली जाणार आहे.
या टोल माफीचा लाभ घेण्यासाठी वारकऱ्यांना विशेष ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. हे ओळखपत्र दाखवून टोल नाक्यावर टोल माफीचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासाचा खर्च कमी होणार आहे आणि यात्रेचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.शासनाने हे ओळखपत्र कोणत्या मार्गाने वितरीत करावे याबद्दल सखोल विचार केला असून, यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाणी ही ओळखपत्रे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच, वारकऱ्यांसाठी या मार्गावरील सुरक्षा आणि सुविधा देखील वाढवण्यात येणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सरकारच्या या पावलाचे कौतुक केले आहे.