विरोधकांनी महिला पंतप्रधानपदाचा चेहरा पुढे आणावा; मोठा राजकीय बदल घडू शकतो – भास्कर जाधव
पुणे (प्रतिनिधी) : देशातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपला प्रभावी आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एखाद्या महिलेचा चेहरा पुढे आणण्याची गरज असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. महिला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झाल्यास देशाच्या राजकारणात मोठी घडामोड होऊ शकते, असेही ते म्हणाले. "माझ्या मनात महिला पंतप्रधानपदासाठी एक चेहरा आहे; मात्र त्याबाबत सध्या बोलणे उचित ठरणार नाही," असे सांगत त्यांनी उत्सुकता वाढवली.चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच महायुतीतील अंतर्गत मतभेद यांसारख्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय स्थितीवरही निशाणा साधला. "बंडखोर उमेदवार उभे करणे ही भाजपची जुनी पद्धत आहे. ज्या-ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटाला उमेदवारी देण्यात आली, त्या ठिकाणी भाजपकडूनच बंडखोर उमेदवार मैदानात उतरवण्यात आले. शिंदे गटाला १७ पैकी १० जागांची अपेक्षा होती; मात्र त्यांच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या. त्यानंतरही एखादा उमेदवार विजयी झाला, तर त्याचे श्रेय भाजप स्वतःकडे घेईल," असा दावा जाधव यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याच्या बाबतीत जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना जाधव यांनी अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील संवादाचा उल्लेख केला. "बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए.. लंबी नहीं," असे म्हणत त्यांनी टोला लगावला. "केवळ किती दिवस सत्तेवर राहिलो यावर कर्तृत्व ठरत नाही. त्या काळात देशवासीयांच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडवून आणले, याचे मूल्यमापन सरकारने करायला हवे," असेही ते म्हणाले.




