शहरातील खड्डे मुजवा, अन्यथा आंदोलन छेडू - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शहरातील खड्डे मुजवा, अन्यथा आंदोलन छेडू - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

कागल (प्रतिनिधी) - येत्या काही दिवसात दिवाळी व कागल शहराचा उरूस सुरू होत आहे.त्यामुळे शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये - जा  होते. बस स्थानक परिससह शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दिवाळी व गहिनीनाथ गैबीपीर उरूस सुरु होण्यापूर्वी बस स्थानक परिसरासह शहरातील  खड्डे तातडीने मुजवावेत अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले. अन्यथा, नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. यावर मुख्याधिका-यांनी दिवाळी व उरुसापूर्वी हे खड्डे मुजवून घेऊ असे सांगितले. तर या निमित्ताने शहरात लावण्यात येणाऱ्या डीजीटल फलकांच्या बाबतीत पालिका प्रशासनाकडून भेदाभेद केला जातो. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या फलक लावणाऱ्यांकडून सर्व फलकांची पावती काढली जात नाही, तर त्यांचे फलक मुदतीपेक्षा अधिक दिवस ठेवले जातात. 

शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणारे फलक मुदत संपलीकी लगेच काढले जातात. सर्वच फलक मुदतीत काढावेत व सर्वांच्या पावत्या कराव्यात अशी ही मागणी केली. तसेच कागलचे आमदार व मंत्र्यांनी खड्डे मुक्त कागलसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. तो निधी गेला कुठे? असा सवालही उपस्थित केला.तर अतिक्रमणाबाबत दिलेल्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही ती त्वरित करावी अशी ही आग्रही मागणी या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली. 

निवेदनातील मजकूर असा -

कागल शहरातील एस.टी. स्टैंड परिसर तसेच शहरातील विविध मुख्य रस्ते व गल्लीबोळ येथे असंख्य खड्डे निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्‌यांमुळे वाहनधारक व पादचारी यांना अपघातांचा धोका वाढला असून  बारीक-सारीक अपघात घडलेले आहेत.

विशेषतः एन.एच.-४ महामार्गावरील दोन्ही बोगद्‌यांच्या आसपास मोठमोठे खड्डे पडलेले असून, त्यातून दररोज हजारो वाहने जात असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. आपण स्वतःही या मार्गाने ये-जा करत असताना ही समस्या स्पष्ट दिसून येते, तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

आगामी दिवाळी सण तसेच कागलचा ऊरुस लक्षात घेता शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व खड्‌डे मुजविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासह रस्ते दुरुस्ती बाबत तात्काळ  कार्यवाही करावी.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय कदम, बाळू हेगडे, राजे बँकेचे संचालक दीपक मगर, अरुण गुरव, सुशांत कालेकर,नंदकुमार माळकर,सुर्यकांत कदम, प्रमोद सोनुले,गजानन माने,हिदायत नायकवडी,संतोष मिसाळ, सचिन निंबाळकर, चेतन भगले,पांडुरंग जाधव, संदीप पसारे, संदीप नेरले, प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते.