शिवसेना ठाकरे गटाचा घरोघरी प्रचार अन् मतदानादिवशी गायब झाली रविना टंडन ; नेमकं कारण काय..?

शिवसेना ठाकरे गटाचा घरोघरी प्रचार अन् मतदानादिवशी गायब झाली रविना टंडन ; नेमकं कारण काय..?

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या असून त्यांचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र या चुरशीच्या लढतीत भाजपाने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकांपूर्वी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या पक्षांना पाठिंबा जाहीर केला, तर काही कलाकार प्रत्यक्ष प्रचारातही सहभागी झाले. ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री रविना टंडन हिने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. तिचे प्रचारातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, रविना टंडन मतदानादिवशी परदेशात गेल्यामुळे सोशल मीडियावरती जोरदार ट्रोल झाली. तिच्या अनुपस्थितीचे कारण आता समोर आले आहे. 

रविना टंडन हिने गळ्यात मशाल चिन्ह असलेला पट्टा घालून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. ती वांद्रे पश्चिम प्रभाग क्रमांक १०१ मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या उमेदवार अक्षता मेनेजेस यांच्यासाठी मत मागताना दिसली. रविनाचा हा खुला पाठिंबा शिवसैनिकांना विशेष भावला आणि तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुकही झाले.

मात्र मतदानाच्या दिवशी संपूर्ण मुंबईत नागरिक मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले असताना रविना टंडन कुठेही दिसली नाही. जोरदार प्रचार करणारी अभिनेत्री मतदानाच्या दिवशी अनुपस्थित का राहिली, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. गुरुवारी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून चाहत्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले, पण रविनाची गैरहजेरी ठळकपणे जाणवली.

https://www.instagram.com/reel/DTbuFR1iQr3/?utm_source=ig_web_copy_link

यामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत, प्रचार करणाऱ्या रविनाकडून अशी अपेक्षा नव्हती की तिने मतदानासारखी नागरी जबाबदारी पार पाडली नाही, असे मत व्यक्त केले. मात्र आता तिच्या अनुपस्थितीमागील खरे कारण समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविना टंडनच्या घरात अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तिला तातडीने परदेशात जावे लागले. रविनाला ओळखणाऱ्यांच्या मते, ती नेहमीच आपल्या हक्कांबाबत आणि नागरी कर्तव्यांबाबत जागरूक असते आणि सार्वजनिक व्यासपीठांवरही याविषयी स्पष्ट भूमिका मांडत असते. त्यामुळे तिची मतदानाच्या दिवशीची अनुपस्थिती ही परिस्थितीजन्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.