श्रमाच्या योग्य मोबदल्यासाठी विविध संघटनांचे ठिय्या आंदोलन - मुकुंद पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शेतशिवारात दिवस - रात्र राबणारा बळीराजा आज शासनाच्या दारात आपल्या श्रमांचा योग्य मोबदला मिळावा म्हणून लढा देत आहे. ऊसाला तळहाताच्या फोडासारखं जपणारा शेतकरी आज सरकारी दालनात आपला घामाचा हिशोब मांडण्यासाठी झटत आहे. ऊस दरासंदर्भात आणि विविध मागण्यांसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, कोल्हापूर येथे विविध संघटनांचे ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं आझाद हिंद क्रांती संघटनेचे प्रमुख मुकुंद पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी आणलेली जेवणाची शिदोरी आंदोलकांसोबत आझाद हिंद क्रांती संघटनेचे प्रमुख मुकुंद पाटील, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने तसेच शेतकऱ्यांनी वाटून खाल्ली.

आझाद हिंद क्रांती संघटनेचे प्रमुख मुकुंद पाटील म्हणाले, प्रशासकीय स्तरावर या आंदोलनातील मागण्या संदर्भातील साखर कारखाने दराबाबत बाबत खुलासे, त्रुटी व सीए, ऑडिटर रिपोर्ट यातील एकसूत्रता सर्व लेखाजोखाची माहिती अद्यापही विसंगती व दिरंगाई होत आहे. याबाबत साखर उपसंचालक अधिकारी अजूनही सुस्तावले आहेत. साखर उपसंचालक कार्यालयात अजूनही आवश्यक आकडेवारी आणि अहवाल पूर्णपणे सादर झालेले नाहीत. कारखान्यांना सीजन संपल्यापासून १२० दिवसांच्या आत सर्व माहिती सादर करणे आवश्यक असते, मात्र ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात विलंबित आहे.
या दिरंगाईमुळे आंदोलन आजही सुरू असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एका बाजूला कारखाने FRP दर रिकव्हरी बेसवर जाहीर करत असताना शेतकऱ्यांची ₹३७५० + ₹२०० या दराची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्यामुळे ऊस वाहतूक रोखण्यात आली असून कारखान्यांची पुढील भूमिका काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ठिय्या आंदोलनावेळी प्रणित अध्यक्ष, शेतकरी नेते ज्ञानदेव पाटील, युवराज आडनाईक, रणधीर पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते.




