श्रीलंकेची कठोर भूमिका; इराणला दिलासा,अमेरिकेची मागणी धुडकावली

श्रीलंकेची कठोर भूमिका; इराणला दिलासा,अमेरिकेची मागणी धुडकावली

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य पूर्वेतील युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझवरील तेल वाहतुकीला फटका बसला आहे. होर्मुझ मार्ग सुरळीत करण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु ट्रम्प यांना हवं तसे यश मिळत नाही. या युद्धात श्रीलंकेने अमेरिकन लढाऊ विमानांना त्यांच्या जमिनीवर उतरवण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दक्षिण पूर्वेकडील मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेला २ लढाऊ विमाने उतरवायची होती. परंतु राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांनी अमेरिकेची ही मागणी धुडकावली.

शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती यांनी संसदेत ही घोषणा केली. संसदेत राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके म्हणाले की,जिबूतीहून आलेल्या दोन अमेरिकी लढाऊ विमानांनी ४ आणि ८ मार्च रोजी श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली. मात्र दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या. अनेक दबावानंतरही आम्ही तटस्थ भूमिका कायम ठेवली. आम्ही झुकणार नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. परंतु तटस्थ भूमिका कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले.

अमेरिकेला जिबूतीमधील एका तळावरून आठ अँटीशिपविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली दोन लढाऊ विमाने मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणायची होती, पण श्रीलंकेने स्पष्टपणे नकार दिला. श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांचे हे विधान दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत सर्जिओ गोर यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी आले आहे. राष्ट्रपती दिसानायके आणि सर्जिओ गोर यांनी महत्त्वाचे सागरी मार्ग आणि बंदरे सुरक्षित करणे, परस्पर फायदेशीर व्यापार आणि व्यावसायिक संबंध दृढ करणे तसेच मुक्त, खुले आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांवर चर्चा केली. ४ मार्च रोजी अमेरिकेने बेटाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचे शहर असलेल्या गॉलजवळ इराणच्या 'आयरीस देना' या फ्रिगेटवर टॉर्पेडो हल्ला केला. या हल्ल्यात ८४ खलाशी ठार झाले तर ३२ जणांना वाचवण्यात आले.

हे जहाज भारतातील विशाखापट्टणम येथे झालेल्या नौदल ताफ्याच्या संचलन सरावातून मायदेशी परतत होते. दोन दिवसांनंतर २१९ खलाशांना घेऊन जाणाऱ्या 'आयरीस बुशेहर' या दुसऱ्या इराणी जहाजाने कोलंबो बंदरात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. श्रीलंकेने या जहाजाला पूर्वेकडील त्रिंकोमाली बंदराकडे वळवण्याचा आदेश दिला. यापैकी एकूण २०४ खलाशी आता कोलंबोजवळील नौदल तळावर वास्तव्यास आहेत. अमेरिकेकडून इराणी युद्धनौकेवर हल्ला झाला होता. त्यावेळी श्रीलंकेने रेस्क्यू ऑपरेशन करत अनेकांचे जीव वाचवले होते. त्याशिवाय मृत सैनिकांचे मृतदेह इराणला पाठवले.