अभंग-भक्तीगीतांच्या सुरेल मैफिलीने श्रीराम मंदिरात जन्मोत्सवास प्रारंभ
कागल (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात ‘ध्यान लागले श्रीरामाचे’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर झालेल्या श्रवणीय अभंग व भक्तीगीतांच्या सुरेल मैफिलीत भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संगीत विशारद स्वरांजली वाघुर्डीकर यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली.

श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वरांजली यांनी ‘तुझ्या कृपेने दिन उगवे हा’, ‘जय शारदे वाघेश्वरी’, ‘राम का गुणगान करे’, ‘प्रभू मज एकच वर द्यावा’, ‘निर्गुणाची भेटी आलो सगुना संगे’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘ध्यान लागले श्रीरामाचे’, ‘असा हा एकच श्री हनुमान’ अशा एकापेक्षा एक सरस भक्तीगीतांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या मैफिलीत सतीश वाघोडेकर (हार्मोनियम), संदीप सूर्यवंशी व श्रेयस माळी (तबला), स्वरूप ससे (रिदम) यांनी सुरेल साथ दिली, तर विठ्ठल भोपळे यांनी प्रभावी निवेदन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
संगीतमय कार्यक्रमानंतर कांचनताई धनाले व निलीमा देशपांडे यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवनकार्यावर आधारित सुश्राव्य प्रवचन झाले. या प्रवचनालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कागलच्या स्वानंद व इचलकरंजीच्या योगिनी महिला भजनी मंडळाचा संगीत हरी भजनाचा कार्यक्रम झाला.




