समृद्धी कुंभार हिला वुशू स्पर्धेत तीन सुवर्णपदके
कोल्हापूर (प्रतिनिधी):डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (DBATU), लोणेरे आणि विद्यापीठ मंडळ जळगाव विभागीय क्रीडा विभागातर्फे धुळे येथील बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटर झोनल वुशू स्पर्धेत कोल्हापूरच्या समृद्धी महेंद्र कुंभार हिने दैदिप्यमान यश संपादन केले. समृद्धीने तावलू प्रकारातील चॅनकॉन, जैनशू आणि कवॉनशू या तीनही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून 'गोल्डन हॅट्ट्रिक' साधली आहे.

समृद्धीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची 'ऑल इंडिया युनिव्हर्सिटी' राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समृद्धी ही बापुजी साळोखे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी द्वितीय वर्षात असून वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टची खेळाडू आहे.
तिच्या या यशाबद्दल प्राचार्य सपाटे, क्रीडाशिक्षक ऋषिकेश मेथे, वुशू संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा वळीवडे आणि सचिव सुभाष पासान्ना यांनी तिचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. तसेच तिला प्रशिक्षक अविनाश पाटील आणि सतीश वडणगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समृद्धीच्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




