'हा' अहवाल सादर करूनही सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का? - आ. रोहित पवार

'हा' अहवाल सादर करूनही सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का? - आ. रोहित पवार

मुंबई - राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्ते (रम्मी) खेळल्याचा आरोप झाल्यानंतर, आता चौकशी अहवालात त्यांच्या विरोधात ठोस पुरावे समोर आले आहेत. अहवालानुसार मंत्री कोकाटे यांनी अधिवेशनाच्या काळात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी विधानमंडळाच्या चौकशी अहवालाचा उल्लेख करत, “मंत्री कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर पूर्ण १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत होते. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही सादर करण्यात आला आहे. तरीही सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

मंत्री कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. "रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांना विसरा हमी, खेळा रम्मी," अशा शब्दांत आमदार रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुनील तटकरे यांच्यात मंत्री कोकाटे यांच्या भवितव्यावर चर्चा झाली असून, त्यांच्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे देण्याचा पर्याय विचाराधीन आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली असून, “कोकाटे यांचे स्पष्टीकरण सरकारसाठी काहीच उपयोगाचे ठरणार नाही,” असा त्यांचा ठाम मतप्रदर्शन असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या हकालपट्टीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.