हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार 'या' सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री

मुंबई - सध्या अनेक कलाकार राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमधून येत असून, अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. अभिनेता सयाजी शिंदे आणि सुशांत शेलार यांसारखे काही कलाकार तर राजकारणातही सक्रीय आहेत. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ मधून एंट्री -
ऐश्वर्य ठाकरे आपला डेब्यू दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी क्राईम ड्रामा सिनेमातून करणार आहे. या सिनेमाचं नाव ‘निशांची’ असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांनी उत्साहाने स्वागत केलं असून, अनेकांनी सोशल मीडियावर कौतुकाचे पोस्ट्स शेअर केल्या आहेत.
‘निशांची’मध्ये ऐश्वर्यसोबत वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.
दोन भावांचं गुंतागुंतीचं नातं -
‘निशांची’ हा सिनेमा दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नात्याभोवती फिरतो. सिनेमाची कथा रॉ आणि ग्रिटी स्टाईलमध्ये मांडली गेली असून, त्याची झलक टीझरमध्ये स्पष्टपणे दिसते. सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं असून, जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्स यांच्या बॅनरखाली अजय राय आणि रंजन सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
राजकीय वारसा, पण अभिनयात रस -
राजकीय पार्श्वभूमी असूनही ऐश्वर्य ठाकरे याला राजकारणात रस नाही. अभिनयक्षेत्रातच आपलं करिअर घडवायचं त्याचं ठाम निर्णय आहे. यापूर्वी तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.
आता तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे आणि ‘निशांची’ हा त्याचा पहिलाच चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.