TV विश्वातील अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत; सहकलाकारांकडून केळवण
मुंबई (प्रतिनिधी) : मे महिना जवळ आला की, लगीनघाईला सुरुवात होते. मराठी कलाविश्वातही अनेक जण लग्नाच्या बेडीत अडकले. छोट्या पडद्यावरील मालिकेतील अनेक अभिनेत्रींनी या महिन्यात लग्न केलं. अशातच आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार लवकरच एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.गायत्रीने अलिकडेच आपल्या नवऱ्यासह काही फोटो सोशल मीडियात शेअर केले होते.

तिनं फोटो शेअर करुन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. श्रीकांत चवरे असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. दोघांची भेट नेमकी कशी झाली होती? हे त्यांनी अनेक मुलाखतीतून स्पष्ट केलं होतं.अलिकडेच अभिनेत्रीचं केळवण झालं. नाटकाच्या टीमनं तिचा थाटामाटात केळवण केलं. केळवणाचा खास व्हिडीओही तिनं सोशल मीडियात शेअर केला.व्हिडीओ शेअर करत गायत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'BEST केळवण..काही BEST माणसांकडून..आपल्या आयुष्यात अशी कमी माणसं आहेत, जी कमी वेळात येतात आणि आपलंसं करुन टाकतात'.'सिरिअल किलर या नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते, भाऊ कदम,तेजस, गौरी तसेच संपूर्ण टीम खूप खास आहे.
प्रणय तेली सर आणि तुमच्या कुटुंबाचेही खूप आभार. केदार देसाई यांच्या कुटुंबाचेही आभार. माझ्या केळवणासाठी तुम्ही सुंदर तयारी केली, त्याबद्दल आभार', असं गायत्री म्हणाली.या केळवणासाठी खास अभिनेत्रीच्या आवडीचे विशेष पदार्थ तयार करण्यात आले. मोदक, पुरणपोळी, फिश फ्राय, कोलंबी फ्राय, घावण, माशाचं सार आणि भात असा मेन्यू होता.सहकलाकारांनी मिळून अभिनेत्रीचं औक्षण केलं. गायत्रीची ओटीही भरली. यावेळी अभिनेत्री भारावून गेली, हे व्हिडीओतून आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




