आशियाई कुस्ती स्पर्धेत कोपार्डेच्या मातीतील पैलवानाची आंतरराष्ट्रीय भरारी; खासदार महाडिक यांच्याकडून गौरव पाटीलचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : थायलंड येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे (ता. करवीर) गावचा आंतरराष्ट्रीय पैलवान गौरव पाटील याचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार महाडिक यांनी गौरवला पुढील जागतिक पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

सेना केसरी पैलवान गौरव पाटील हा कोपार्डे येथील कुस्ती संकुल केंद्रात सराव करतो. त्याने या आशियाई कुस्ती स्पर्धेत ७५ किलो वजन गटात 'ग्रीको रोमन' प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. कोपार्डे गावच्या मातीत घाम गाळून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या गौरवचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
सत्कारादरम्यान बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "मेहनत, चिकाटी आणि अखंड देशप्रेमाच्या जोरावर गौरवने मिळवलेले हे यश केवळ कोपार्डे गावाचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचवणारे आहे. त्याने भविष्यात अशीच उत्तुंग कामगिरी करावी, यासाठी महाडिक परिवार आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू."
या सत्कार सोहळ्याप्रसंगी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




