इतिहासाचा शोध घेणारा दीपस्तंभ मालवला-जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले, इतिहासाला सत्याचा कणा देणारे आणि संशोधनाला निष्ठेची दिशा दाखवणारे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय वेदनादायी घटना आहे. त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक तेजस्वी दीपस्तंभ कायमचा मालवला आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी इतिहासाला पुराव्यांची भक्कम जोड दिली. त्यांनी मांडलेला विचार हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नव्हता, तर समाजाला दिशा देणारा, प्रबोधन करणारा आणि सत्यशोधकी वृत्तीला बळ देणारा होता.
कापशी (सेनापती ) येथे सर सेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक व पुतळा झाला त्याचे सर्व श्रेय कै. जयसिंगराव पवार यांना जाते, पुतळ्याचे स्वरूप त्याचा आकार पेहरावा कसा असावा याचे सर्व मार्गदर्शन कै. पवार यांनी केले.
शाहू स्मारकाच्या कार्यातून, तसेच शिवाजी विद्यापीठ यांच्या माध्यमातून त्यांनी संशोधकांची एक मोठी पिढी घडवली. त्यांचे लेखन, संशोधन आणि मार्गदर्शन हे पुढील अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल.
त्यांनी आयुष्यभर जपलेली सत्यनिष्ठा, अभ्यासाची खोली,विवेकी भूमिका आणि समाजप्रबोधनाची तळमळ हीच त्यांची खरी ओळख राहील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.




