उपग्रह प्रतिमांमध्ये मोसमी ढगांचा अभाव; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा
मुंबई (प्रतिनिधी) : देशात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला असून 15 जूनच्या उपग्रह प्रतिमांमध्ये मोठ्या भागात ढगांचा अभाव दिसत आहे. 4 ते 15 जूनदरम्यान अपेक्षित 53.7 मिमी पावसाऐवजी फक्त 19.2 मिमी पाऊस झाला असून 64% तूट नोंदली गेली आहे.

यामुळे महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. हवामान विभागानुसार, वरच्या वातावरणातील वाऱ्यांची असामान्य रचना आणि पश्चिमी जेट स्ट्रीम दक्षिणेकडे सरकल्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली आहे.महाराष्ट्रात 17 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात उष्ण हवामान राहील. कोकण-गोव्यात दमट उष्णता जाणवेल.
16 जून रोजी पूर्व व ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, काही भागांत जोरदार वारेही वाहू शकतात.17 जून रोजी ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि मध्य भारतात वादळी पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता कायम राहील.




