अधिक मासातील ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून रोहिणी खडसे व राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र

अधिक मासातील ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून रोहिणी खडसे व राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र

मुंबई (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक मासानिमित्त आयोजित ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले असून रोहिणी खडसे आणि राम शिंदे यांच्यात शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात जाहीर स्वरूपात ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावातील मुली आणि जावयांना पारंपरिक पद्धतीने जेवण देण्यात आले. चौंडी येथे झालेल्या या उपक्रमानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आणि या कार्यक्रमाची राज्यभर चर्चा सुरू झाली.

या कार्यक्रमावर रोहिणी खडसे यांनी टीका करत “अशा कार्यक्रमांपेक्षा रोजगार मेळावे आणि विकासावर लक्ष द्यावे” असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या मते, सध्याच्या काळात तरुणांना नोकरी आणि रोजगाराच्या संधी अधिक महत्त्वाच्या आहेत.या टीकेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद वाढत गेला. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर नाव न घेता केलेल्या पोस्टमध्ये “रोजगारासारख्या मूळ प्रश्नांवर बोललो की काहींना मिर्ची लागते” असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी हिंदुत्व आणि सामाजिक भूमिकांवरही प्रश्न उपस्थित करत काही गंभीर आरोप केले.

याला प्रत्युत्तर देताना राम शिंदे यांनी रोहिणी खडसे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला. “रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्त्व काय समजणार?” असा टोला त्यांनी लगावला. तसेच त्यांनी पारंपरिक सण-उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे समर्थन करत अशा उपक्रमांना समाजात एकोपा वाढवणारे म्हटले.

या संपूर्ण वादामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून स्थानिक पातळीवरही समर्थकांमध्ये चर्चेला आणि प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘धोंडे जेवण’ हा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.