कोल्हापूरच्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी हबमध्ये 'इतक्या' लाखांची फसवणूक ; नेमकं प्रकरण काय..?
कोल्हापूर (प्रतिनिधी) - फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी हबमधून बनावट ग्राहकांच्या नावाने 2 लाख 7 हजार रुपयांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कर्मचाऱ्याने टेक्नॉलॉजीचा गैरवापर करत कंपनीच्या चार महागड्या वस्तू यामध्ये दोन आयफोन, एक एअरपॉड आणि एक ॲपल वॉच स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि कंपनीला फसवले.

फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अभय करणूरकर (रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) असे असून, तो ताराबाई पार्क येथील फ्लिपकार्ट डिलिव्हरी हबमध्ये कार्यरत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी ते 15 मे 2025 या कालावधीत अभयने आपला मित्र अमिर सोहेल मकानदार (रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) याच्या मदतीने बनावट ग्राहक ‘आकाश पाटील’ (कोल्हापूर) आणि ‘मित्तल’ (सध्या कोल्हापूर, मूळ रा. कुर्ला, मुंबई) यांच्या नावाने COD (Cash on Delivery) पद्धतीने ऑनलाइन ऑर्डर केली.
ऑर्डर पाठवण्यासाठी आलेल्या वस्तू अभयने आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्या बॉक्समधील वस्तू काढून, रिकामे बॉक्स ‘ग्राहक मिळाला नाही’ असे कारण देऊन परत कंपनीकडे पाठवले. ही फसवणूक कंपनीच्या अंतर्गत तपासणीत उघडकीस आली. यासंदर्भात अधिकारी प्रकाश रतिलाल शहा (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी अभय करणूरकर आणि अमिर सोहेल मकानदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवहारांचे रेकॉर्ड तपासले जात आहेत.
फसवणुकीचा प्रकार लक्षात येण्यासाठी संशयितांनी सुरुवातीला एकच मोबाईल मागवून कंपनीच्या यंत्रणांतील त्रुटींचा अंदाज घेतला. त्यानंतर तीन अतिरिक्त ऑर्डर करून एकूण चार महागड्या वस्तू घेऊन कंपनीची मोठी फसवणूक केली. मात्र, कंपनीने वेळेवर तपासणी सुरू केल्यामुळे हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणावरून ई-कॉमर्स क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकांची शक्यता अधोरेखित होते. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डिलिव्हरी किंवा पेमेंटविषयी कोणतीही शंका असल्यास अधिकृत प्लॅटफॉर्म किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. तसेच, सायबर क्राईम विभागाकडेही यासंदर्भात तक्रार करता येते.




