ज्येष्ठ नेते कॉ. आनंदराव मोरे यांना अखेरचा लाल सलाम : मरणोत्तर देहदानाने दिला प्रेरणादायी संदेश

ज्येष्ठ नेते कॉ. आनंदराव मोरे यांना अखेरचा लाल सलाम : मरणोत्तर देहदानाने दिला प्रेरणादायी संदेश

मूरगूड (प्रतिनिधी) - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान देत तुरुंगवास भोगलेले आणि स्वातंत्र्या नंतरच्या आयुष्यात वंचितांच्या प्रश्नांसाठी अखेरपर्यंत कार्यरत असणारे महालवाडी (ता. भुदरगड) येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड आनंदराव शिवाजी मोरे यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन  झाले. सेवा हाच धर्म मानणाऱ्या कॉम्रेड मोरे यांच्या मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाने काहींना नवसंजीवनी मिळणार आहे. मरतानांही उजळण्याचा मंत्र देणाऱ्या कॉम्रेड मोरे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा लाल सलाम देण्यात आला.  

महालवाडी सारख्या दुर्गम भागात जन्मलेल्या कॉम्रेड मोरे यांचा स्फूर्तीदायी जीवनपट प्रेरणादायी आहे.त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे खंबीरपणाचे मूर्तिमंत रूप होतं . वयाच्या ९८ व्या वर्षीही पायी रपेट मारणारे, रोज महालवाडी, गारगोटी रस्त्यावर अनेकांना भेटणारे, शंभरीच्या उंबरठ्यावरही पंचेंद्रियावर पूर्ण प्रभुत्व ठेवणारे हे एक अवलिया  व्यक्तिमत्त्व! नजरेत प्रकाश, चालण्यात चपळाई, आवाजात ताकद व तरुणाईलाही लाजवेल अशी शरीरयष्टी असणाऱ्या अन शंभरीत असलेल्या आनंदरावांची झालेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.कॉ. मोरे हे ब्रह्मनाथ सेवा संस्थेचे संस्थापक संचालक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्रसैनिक काका देसाई यांच्या समवेत शस्त्रागार सांभाळण्याचे काम त्यांनी केलं आहे. तसेच स्वातंत्रलढ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत लढ्यात सहभागी होते व त्यांना त्यावेळी तुरुंगवास देखील झाला होता. शेतकरी, कामगार, धनगर आदी वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर लढले. कॉ. गोविंद पानसरे व कॉ. दत्ता मोरे ,कॉम्रेड काका देसाई (म्हसवे) यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले. विविध चळवळींसोबतच अध्यात्माची देखील त्यांना प्रचंड आवड होती. पंढरपूरच्या विठुरायाचे सुद्धा ते महिन्याचे वारकरी होते.

कॉम्रेड मोरे यांनी सुरुवातीला मरणोत्तर नेत्रदान आणि नंतर देहदानाचा संकल्प केला होता. यावरूनच त्यांनी नव्या पिढीसाठी आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयास संशोधनासाठी सुपुर्द केला. असे आयुष्यभर प्रेरणा देणारे आनंदराव देहदानाच्या माध्यमातून चिरंतन स्मृती ठेवून हरपले आहेत. 

कॉम्रेड मोरे यांच्या पश्चात दोन मुले, दोन भाऊ, सुना, मुली,पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. तसेच सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय मोरे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक कॉ. व्यंकटराव मोरे यांचे ते वडील होते.