पाटील आणि महाडिक चक्क एकत्र ; जिल्ह्यातील राजकारणात खळबळ

पाटील आणि महाडिक चक्क एकत्र ; जिल्ह्यातील राजकारणात खळबळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकारणाला अनपेक्षित असं  वळण मिळालं आहे. जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेत काँग्रेस आणि भाजपचे गट प्रत्यक्षात एकत्र येत धक्कादायक आघाडी उभी राहिली असून त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे गटाच्या अनपेक्षित एकजुटीची चर्चा सुरू असताना आता खा. धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे गट एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे माजी खा. राजू शेट्टी यांनीही या आघाडीत सहभाग दर्शवला आहे.

या नव्या शक्तीसमूहात काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांचा गट तर दुसरीकडे भाजपचे खा. धनंजय महाडिक आणि आ. अमल महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन गट आता एकत्र लढणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिरोळ तालुका विकास आघाडीने हा निर्णय घेतल्याचे समजते.

मागील निवडणुकीत ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेवर सत्ता स्थापित करणारे आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात आता एकत्र येणाऱ्या विरोधकांचे बलाढ्य केंद्र उभे राहिले आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याशी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे भाजपही यड्रावकरांच्या विरोधात उभा राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

अर्ज माघारीची अंतिम मुदत केवळ काही तासांवर येऊन ठेपली असताना जयसिंगपूर - शिरोळ नगरपालिकांमध्ये ‘जयसिंगपूर विकास आघाडी’ची घोषणा करण्यात आली. या आघाडीत काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपचे माधवराव घाटगे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे आदी मान्यवरांनी पुढाकार घेतला.

महाडिक गट आणि आ. सतेज पाटील यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या वैराची पार्श्वभूमी सर्वश्रुत असतानाही झालेली ही अनपेक्षित जुळवाजुळव आगामी निवडणुकांचे चित्र पूर्णतः बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिरोळ नगरपालिकेतही विरोधकांची हाच पद्धतीने एकजूट दिसत असल्याने यड्रावकरांना कठीण आव्हान उभे राहणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान ‘शिरोळ तालुका विकास आघाडी’ अधिकृत नसल्याची हरकत ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ ने घेतली. दिवसभर चाललेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिरोळ तालुका विकास आघाडीने निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या बाजूची भूमिका ऐकून घेत नसल्याचा आरोपही केला.

या प्रक्रियेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. माजी खा. राजू शेट्टी यांचे पीए स्वस्तिक पाटील वकिलांसोबत मुद्दे मांडत असताना, राजर्षी शाहू आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर यांनी "यांचा काय संबंध? हे इथे का आले? यांना बाहेर काढा," असा सवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.