महापालिकेच्या वतीने बुधवारी जुन्या वस्तू व सर्व टाकाऊ इलेक्ट्रीक साहित्याचे घरोघरी संकलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारची कापडे, उशी, गादी, खराब बॅटरी, ट्यूब लाईट, बल्ब, टाकाऊ इलेक्ट्रीक वस्तू, मुदतबाह्य औषधे, हजरडस्ट मटेरियल, डास, मुंग्या व इतर किटक नाशक औषधे (कालबाह्य), जुनी पादत्राने या वस्तू मागील महिन्यापासून घरोघरी घंटागाडीद्वारे संकलन करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शहरामध्ये हि मोहिम राबविली जात आहे. हि मोहिम अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिण्यात राबविण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार जुनी कपडे, जुन्या गादयां व सर्व टाकाऊ इलेक्ट्रीक साहित्य उघड्यावर किंवा इतरत्र न टाकता या वस्तूंवर महानगरपालिकेच्यावतीने संबंधीत कचरा प्रक्रिया प्रकल्पावर पाठवून शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशी तरतूद आहे. या शासन निर्देश/तरतूदीनुसार शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील वापरात नसलेले सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य या महिन्यातील बुधवार, 13 ऑगस्ट रोजी आपल्या घरी येणाऱ्या कचरा घंटागाडी (टिप्पर) मध्ये सकाळी जमा करण्यात यावे. यानंतर त्याचदिवशी आपल्या दारी दुसऱ्या खेपेसाठी येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपला दैनंदिन वर्गीकृत केलेला ओला व सुका कचरा जमा करुन घेतला जाणार आहे. हा उपक्रम महानगरपालिकेमार्फत नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या दुस-या बुधवारी राबविण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी आपले टाकाऊ साहित्य इतरत्र अथवा रस्त्याकडेला कोठेही न टाकता महापालिकेच्या घंटागाडीकडे देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच या उपक्रमास नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांना या व्यतिरिक्त सोमवार ते शनिवार, सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत देखील आपल्या संबंधित वॉर्डातील स्वच्छता कार्यालयात या वस्तू स्वखर्चाने जमा करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये स्वच्छता वॉर्ड कार्यालये 1) ए/1 - कपिलतीर्थ मार्केट 2) ए/2 - कळंबा फिल्टर हाऊस 3) ए/3 - कॉ. गोविंदराव पानसरे शाळा, राजोपाध्ये नगर 4) बी - महाराणी ताराराणी विद्यालय, मंगळवार पेठ 5) सी/1 - कोबडी बाजार मटण मार्केट 6) सी/2 - खोल खंडोबा 7) डी - पंचगंगा हॉस्पिटल 8) ई/1 - वि.स. खांडेकर शाळा, रेड्याची टक्की 9) ई/2 - तात्यासो मोहिते हायस्कूल, व्यापारी पेठ 10) ई/3 - एस बॅकवरती, कावळा नाका 11) ई/4 - कसबा बावडा, पॅव्हेलियन ग्राउंड 12) ई/5 - दत्तमंदिर समोर, महाडिक माळ, रुईकर कॉलनी या ठिकाणांचा समावेश आहे.