मानधनधारक खेळाडूंचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश शाहू परिवारासाठी अभिमानास्पद - समरजितसिंह घाटगे

कागल - शाहू साखर कारखान्याचे मानधनधारक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. त्यांचे हे यश शाहू परिवारासाठी अभिमानास्पद आहे.असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
कारखाना कार्यस्थळावर मानधनधारक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.या खेळाडूंचा रोख रक्कम देऊन घाटगे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाच्या संचालिका व कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या.
समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, कोल्हापूर संस्थांनमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती खेळाबरोबर खेळाडूंनाही राजाश्रय दिला. त्यांचा हाच वारसा जोपासताना 'शाहू' चे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना मानधन देऊन प्रोत्साहन दिले. साखर कारखानदारीमध्ये अशा पद्धतीने खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देणारा शाहू साखर कारखाना पहिला कारखाना आहे. आता शाहूच्या या उपक्रमाचे इतर कारखाने अनुकरण करत आहेत. हे कौतुकास्पद आहे अशा गुणवंत खेळाडूंच्या पाठीशी यापुढेही ठाम राहू अशी ग्वाही यावेळी घाटगे यांनी दिली.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले, राष्ट्रीय पॕरा पावरलिफ्टिंग व खेलो इंडियामधील पदक विजेती शुक्ला बिडकरसह धनराज जमनीक, सुकन्या मिठारी, गौरी पाटील, अजय कापडे, अजित कुद्रेमनकर, स्वरूप जाधव, सोहम कुंभार, प्रवीण वडगावकर, विवेक चौगुले, तेजस लोहार, सचिन बाबर यांचा सत्कार झाला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक व शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.