मुरगूडच्या ऐतिहासिक अंबाबाई मंदिरात भक्तिमय वातावरणात सौभाग्यदायी महाकुंकुमार्चन उपासना सोहळा

मुरगूडच्या ऐतिहासिक अंबाबाई मंदिरात भक्तिमय वातावरणात सौभाग्यदायी महाकुंकुमार्चन उपासना सोहळा

मुरगूड (प्रतिनिधी) : मूरगूड येथील ऐतिहासिक अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सकल सौभाग्यदायी महाकुंकुमार्चन उपासना सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अश्विनी गुरव, विजया पाटील, आशा घाटगे यांच्या हस्ते श्री यंत्र व लक्ष्मी पूजन झाले. 

अंबाबाई मंदिरातील सभागृहात झालेल्या या उपासनेदरम्यान संपूर्ण वातावरण मंगलमय व भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेले होते. महाकुंकुमार्चन उपासना ही विशेषत: सुख, समृद्धी व सौभाग्य वृद्धीसाठी केली जाणारी उपासना असल्याने महिलांनी मोठ्या श्रद्धेने यात सहभाग नोंदविला.

महिलांनी मंत्रोच्चार, देवीचे स्तोत्र पठण आणि कुंकुमार्चन अर्पण यामध्ये एकसंध सहभाग देत उपासनेची सांगता केली. या प्रसंगी उपस्थित प्रत्येकाच्या मनात अध्यात्मिक ऊर्जा व सौभाग्यदायी वातावरणाची अनुभूती झाली. यावेळी उपस्थित महिलांनी महाआरतीही केली.