शिक्षण ही जीवनातील सर्वोत्तम गुंतवणूक - पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को - ऑप. बँक लि., कोल्हापूर या बँकेमार्फत पद्माराजे पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासद सत्कार समारंभ, आणि ग्राहक मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे उत्साहात संपन्न झाला. शिक्षण ही जीवनातील सर्वोत्तम गुंतवणूक असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यावेळी केले.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करुन सोहळयास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक करुन बँकेच्या प्रगतीदर्शक आढाव्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये बांदिवडेकर यांनी बँकेने "108 वर्षे पूर्ण " करुन "109 व्या वर्षात पदार्पण" केले असल्याचे सांगितले. शतकोत्तर वाटचाल करणारी आपली बँक ही महाराष्ट्र राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची सहकारी बँक असल्याचे सांगितले. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असल्याचे नमूद करुन मार्च 2025 अखेरच्या सांपत्तिक स्थिती बरोबरच बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत "ग्राहक मेळावा " मध्ये माहिती दिली.
तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आधार असणारी एकमेव बैंक कार्यरत असल्याचे नमूद करुन सेवानिवृत्त सभासदांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे नमूद करुन पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सेवानिवृत्त सभासदांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पुढे म्हणाले, आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात पैसे गुंतविताना ठेवीवर व्याज किती मिळते हे महत्वाचे नसून संस्थेची विश्वासार्हता महत्वाची आहे असे नमूद करून राजर्षि शाहू महाराजांनी ज्या हेतूने बँकेची स्थापना केली तो हेतू खऱ्या अर्थाने साध्य होत आहे. बँकेचे आर्थिक नियोजन, कर्ज वितरण यावर बँकेची प्रगती अवलंबून असून असते. त्याचबरोबर बँकेने यापुढेही अशाप्रकारे उत्तम कामकाज करावे असे नमूद केले. यावेळी बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांचे हस्ते गणेश शिंदे यांचा, बँकेचे संचालक रविंद्र पंदारे यांचे हस्ते अभिजित म्हेत्रे यांचा, उपाध्यक्ष सदानंद घाटगे यांचे हस्ते तुषार बुरुड यांचा व बँकेचे संचालक शशिकांत तिवले यांचे हस्ते डॉ. योगेश कुमार गुप्ता या प्रमुख पाहुण्यांचा शाल व शिवस्नुषा ताराराणी यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ देऊन सत्कार केला.
प्रमुख वक्ते गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये "दुसऱ्यांशी तुलना करत जगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांनी जगाव" याकरीता मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असलेचे नमूद केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल मुळे एकमेकांमधील संवाद कशा पध्दतीने हरवत चालला आहे हे विविध उदाहरणांतून विनोदी शैली मध्ये पटवून दिले. त्याचबरोबर उपस्थित सेवानिवृत्त सभासदांना संबोधित करताना "आनंद देत राहा तुम्हाला आनंद मिळत राहील" असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना देवून जीवनामध्ये आनंदी राहणे महत्वाचे असलेचे त्यांनी नमूद केले. बँकेमार्फत सभासदांकरीता व त्यांचे पाल्यांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येतात याबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले व उपक्रमांचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अभिजित म्हेत्रे यांनी दलाई लामा यांच्या कवितेच्या माध्यामातून समाधानाचे महत्व पटवून देत "समाधानी असाल तर आनंदी राहाल " असे नमूद केले. बँकेचे संचालक मंडळ उत्तमरित्या कामकाज करीत असून नफ्यासाठी चालवली जाणारी संस्था नाहीतर सर्व सभासदांसाठी कार्यरत असणारी संस्था असून बँकेची प्रगती निश्चित आहे असे गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर बँक राबवित असलेल्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांनी प्रेरणादायी कार्याचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित तुषार बुरुड यांनी आपले मनोगतामध्ये बँकेचे प्रगतीचा उल्लेख करीत असताना मित्रासारखीच पाठबळ (आर्थिक) देणारी बँक असलेचे यावेळी नमूद केले. तसेच सेवानिवृत्त सभासदांना पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवून उपजिविके नंतर जिविका सुरु होत असलेने सेवानिवृत्ती नंतरचे जीवन कसे जगावे याबाबत कानमंत्र दिला. यावेळी बँकेतर्फे राबविणेत येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली व बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समारंभामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासदांबरोबरच, इयत्ता 4 थी ते 9 वी आणि 10 वी व 12 वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सभासदांच्या मुलींचा पद्याराजे पारितोषिक अंतर्गत प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर रोख बक्षिसे प्रदान करुन गौरव करण्यात आला. तसेच कै. छत्रुसिंग चव्हाण यांचे स्मरणार्थ इ.10 वी व इ. 12 वी परिक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त केले असतील त्या पैकी गुणांनुक्रमे पहिल्या फक्त पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देणेत आला. एकत्रित 95 विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर रोख बक्षिसे प्रदान करुन गौरविणेत आले. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या जवळपास "300 ते 350 सभासदांचा सत्कार" यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन चे डॉ. संदीप पाटील व रोटरी क्लब ऑफ शिरोली, कोल्हापूर चे प्रेसिडेंट विक्रमसिंह जाधव, सचिव मानिनी जाधव, पॅथक्युअर लॅबोरेटरीचे स्वप्निल भोसले यांचे सहकार्याने व बँकेचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत नेत्रतपासणी, मधुमेह, रक्तदाब, स्त्री रोग सारख्या आजारांवर तज्ञ ॉक्टरांचे माध्यामतून उपचार व मार्गदर्शन करणेत आले. त्याचबरोबर सभासदांना आयुष्यमान भारत कार्ड देखील काढून देणेत आले. त्याचा जवळपास 200 सभासदांनी फायदा घेतला.
बँकेचे उपाध्यक्ष सदानंद रुक्मिणी वसंतराव घाटगे व्यांनी उपस्थितांचे आभार मानून समारंभाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत कंदले यांनी केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर, उपाध्यक्ष सदानंद रुक्मिणी वसंतराव घाटगे, संचालक रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे, शशिकांत शांताबाई दिनकर तिवले, मधुकर आंबुबाई श्रीपती पाटील (एम.एस्.), अतुल मंगल गणपतराव जाधव, विलासराव अनुसया शंकरराव कुरणे, रमेश सरस्वती गणपती घाटगे, अजित सिंधुताई शंकर पाटील, संजय आक्काताई सर्जेराव खोत, किशोर ताई रामचंद्र पोवार, अरविंद सुशिला भिमराव आयरे, संचालिका हेमा सुभाष पाटील, मनुजा शैलेंद्र रेणके, संचालक प्रकाश शांताबाई भिमराव पाटील, तज्ञ संचालक दिपक केराबाई श्रीपतराव पाटील, गणपत पार्वती बाबुराव भालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सुलोचनादेवी रामराव शिंदे यांचे हस्ते सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासद व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




