यशाचे शिखर गाठण्यासाठी छंदाचे रुपांतर करिअरमध्ये करा - कथाकथनकार युवराज पाटील
गगनबावडा (प्रतिनिधी): दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा महत्वाचा टप्पा असून ती एका नव्या आणि मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखून कौशल्याधारित शिक्षणाची कास धरली पाहिजे. संधींचे आकाश मोठे आहे, फक्त तिथे झेप घेण्याची जिद्द हवी, असे प्रेरक विचार प्रसिद्ध व्याख्याते व कथाकथनकार युवराज पाटील यांनी व्यक्त केले.

येथील भैरव विद्यानिकेतन आसगाव शाळेमध्ये सन २०२५-२६ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, यावेळी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका राणी पाटील होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शाळेने तुम्हाला केवळ अक्षरज्ञान दिले नाही, तर उत्तम नागरिक घडवणारे संस्कार दिले आहेत. हे संस्कार आणि अंगी असलेली शिस्त हीच तुमच्या पुढील आयुष्यातील यशाची खरी शिदोरी ठरेल." या मंगलप्रसंगी व्यासपीठावर रवी तुळसावडे व बाळू पाटील, बाजीराव पाटील हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थी भावूक झाले होते.सदिच्छा समारंभ विभाग प्रमुख सागर मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओघवते सूत्रसंचालन योगेश सावंत यांनी केले. उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार किरण माळवी यांनी मानले.या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




