'या' निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पदाधिकारी
कागल (प्रतिनिधी) - कागलच्या उरूसानिमित्त शहरात आलेल्या व्यावसायिकांना पावसामुळे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.त्यांना दिलासा देण्यासाठी उरुस कमिटी व नगर परिषद यांनी या व्यापारी वर्ग व फेरीवाल्यांच्या भावनांचा आदर करून, त्यांच्या पावती रकमेपैकी १०० टक्के रक्कम परत देण्याचा निर्णय घ्यावा,अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कागल शहरातील पदाधिका-यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल आणि ते पुढील वर्षी पुन्हा त्याच उत्साहाने कागल उरूसमध्ये सहभागी होतील असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील मजकूर असा -
कागल शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख व मोठा उरूस भरतो. या उरुस काळात बाहेरील तसेच स्थानिक व्यापारी वर्ग आपला व्यवसाय मांडून या काही दिवसांतील उत्पन्नावर संपूर्ण वर्षाचा उदरनिर्वाह चालवतात.मात्र, यावर्षी सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांचा व्यापार ठप्प झाला असून, गुंतवलेली रक्कमदेखील परत मिळणे कठीण झाले आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय कदम,बाळू हेगडे, राजे बँकेचे संचालक अरुण गुरव, सुशांत कालेकर,सुर्यकांत कदम,गजानन माने,भरत नेरले,पांडुरंग जाधव, आनंदा भोपळे,प्रकाश वाघमारे,आकाश पाटील,विशाल पाडळकर,वसंत मांजरेकर,किरण बेलेकर आदी उपस्थित होते.




