शरद पवार एनडीए मध्ये जाणार? मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील 'ती' बैठक आणि कर्जमाफीवरून कौतुकामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवार एनडीए  मध्ये जाणार? मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील 'ती' बैठक आणि कर्जमाफीवरून कौतुकामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक अनपेक्षित घडामोडी आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्या चर्चा शांत होत नाहीत तोच, शरद पवार यांनी महायुती सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक केले आहे. या कौतुकामुळे 'शरद पवार एनडीए (NDA) सोबत जाणार का?' अशा चर्चा सुरू झाल्या असून, यावर शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हं" - संजय शिरसाट
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी रद्द केल्याबद्दल शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारचे आभार मानले होते. यावर माध्यमांनी मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "शरद पवार यांनी एनडीएचं (NDA) कौतुक केलं आहे, याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळा आहे. राज्यात लवकरच राजकीय समीकरणे बदलण्याची ही चिन्हं आहेत." शिरसाट यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

शरद पवारांनी नेमके काय म्हटले होते?
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकारचे कौतुक करताना शरद पवार यांनी लिहिले होते, "सततची नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेत शासनाने २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची अट घातली होती. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६ आणि २०२६-२७ चे पीककर्ज भरण्याची जाचक अट घालण्यात आली होती. यामुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता. मात्र, राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन शासनाने या दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचे आभार."

पवारांच्या महायुती प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या आमदारांची एक बैठक घेतली होती, त्यामुळेही ते एनडीचा घटक होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

भुजबळ म्हणाले, "शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील बैठकीसाठी विधिमंडळात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दालन जवळ होते, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आमदारांची बैठक घेतली. त्यामागे यापेक्षा वेगळा कोणताही राजकीय अर्थ नाही. शरद पवार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणीही रेड कार्पेट टाकेल, यात काहीच चुकीचे नाही. याचा अर्थ ते इकडे किंवा तिकडे जातील असा होत नाही."

संजय शिरसाट यांनी वर्तवलेली राजकीय समीकरणांची शक्यता आणि छगन भुजबळ यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे शरद पवारांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.