शिवकाळात अशी साजरी केली जायची दिवाळी..?

शिवकाळात अशी साजरी केली जायची दिवाळी..?

Diwali Festival - "साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा" ही संत तुकाराम महाराजांची ओळ आपल्याला सांगून जाते की, दिवाळीचा सण हा फार पुरातन आहे. संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असे. मुघल, डच आणि इतर परकीयांनी सामान्य जनतेवर जुलूम केलेल्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रयतेला सण साजरे करण्यासाठी आश्वस्त केलं. त्यांच्या काळातील दिवाळी म्हणजे केवळ आनंदाचा सण नव्हता, तर ती स्वराज्याच्या पराक्रमाचा आणि जनकल्याणाच्या भावनेचा उत्सव होता.

दिवाळीचा दरबार आणि गडांवरील सजावट

शिवरायांच्या काळात राजमहल, गड-किल्ले आणि सामान्य जनतेची घरं दिवाळीच्या वेळी उजळून निघायची. दिव्यांच्या रांगांपासून ते सुगंधी धूप, फुलांच्या माळा आणि हळद - कुंकवाने दरबार सजायचा. महाराज स्वतः लक्ष्मीपूजन करत आणि दरबारी, कुटुंबीय, राणी यांच्यासह उपस्थित राहत. पूजेनंतर महाराज रयतेला विशेषतः सैनिक, शेतकरी, गरीब नागरिक यांना सन्मानचिन्हं, वस्त्रं, धान्य, जनावरं, आणि कधी नाणी यांसारख्या भेटवस्तू वाटायचे.

शस्त्रपूजन – परंपरेचा गौरव

शिवरायांच्या काळातील दिवाळीतील एक खास परंपरा म्हणजे शस्त्रपूजन. तलवारी, भाले, ढाली, तोफा या शस्त्रांची पूजा करताना 'शौर्य आणि धर्म यांची कधीच कास सोडू नका' असा संदेश दिला जात असे. शिवरायांचं मत होतं की शस्त्र हे केवळ युद्धाचं साधन नाही, तर ते न्याय आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी पूजनीय आहे.

शेतकरी आणि मावळ्यांसाठी खास सण

शरद ऋतूत पीक आलेलं असतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात दिवाळीचा सण अधिकच रंगत असे. शिवरायांच्या सैन्यातही अनेक मावळे हे शेतकरी कुळातील असल्याने हा सण त्यांच्यासाठी मोठ्या भावनेचा होता. या काळात शेतकऱ्यांना बी-बियाणं, जनावरं, करमाफी अशा स्वरूपात मदत केली जाई.

प्रत्येक घर उजळावं हीच शिवरायांची भावना

दिवाळी म्हणजे आनंद आणि प्रकाश. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ती फक्त दिव्यांची नाही, तर रयतेच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पेटवण्याची संधी होती. त्यामुळे अनेकदा गडांवरील साठ्यातून गरीबांसाठी धान्य वाटप केला जाई. करसवलती दिल्या जात, बाजारातील दर नियंत्रित ठेवले जात आणि अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित केला जाई. कोणतंही घर अंधारात राहू नये याची काळजी महाराज स्वतः घेत.

सांस्कृतिक परंपरांचं जतन

या काळात महिलावर्ग घरांची स्वच्छता करून गेरू-चुना लावत, रांगोळ्या काढत, तेलाचे दिवे लावत. गोडधोड फराळ तयार केला जात असे. पुरुषवर्ग गाणी, पोवाडे आणि पराक्रमाच्या कथा सांगत असे. एकूणच दिवाळी हा सण धार्मिकतेसोबत राष्ट्रप्रेम आणि सामाजिक समतेचं प्रतिक बनलेला होता.

एक ऐतिहासिक शिकवण

शिवरायांच्या काळातील दिवाळी आपल्याला हे शिकवते की सण म्हणजे फक्त आनंदाचं कारण नाही, तर तो समाजहित, न्याय, आणि रयतेच्या कल्याणाचा उत्सव असू शकतो. दिवाळीच्या प्रकाशात आपल्याला स्वराज्याचं तेज दिसावं, हीच खरी शिकवण