अखेर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला..!

अखेर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला..!

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता निर्णायक वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, तसेच जागावाटपावर एकमत होणार का, यावर विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट करत हा सस्पेन्स दूर केला आहे. त्यांनी ‘एक्स’ वर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत त्याला “उद्या 12 वाजता” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे उद्या दुपारी ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करतील, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेसाठी सुरुवातीला मनसेने निम्म्या जागांचा आग्रह धरला होता. मात्र, आता मनसेने लवचीक भूमिका घेतल्याचे समजते. तरीही काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरूच आहे. ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता ठाणे, नाशिकसह इतर शहरांमध्येही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनसेला ६० ते ६५ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती आहे. मनसेने शिवडी, वरळी, दादर-माहीम आणि भांडुपमधील काही जागांवर विशेष भर दिला आहे. शिवडीमध्ये तर पक्षाच्या आजी - माजी आमदारांकडूनही जागांची मागणी करण्यात आली आहे.

ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) चे आमदार, नगरसेवक किंवा मजबूत मताधिक्य आहे, त्या जागांवर मनसेचा आग्रह असल्याने काहीसा तिढा निर्माण झाला होता. मात्र, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूतदारपणा दाखवल्याने हा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. उद्याच्या घोषणेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.