आशिया कप विजयानंतर ट्रॉफी वाद : मोहसिन नक्वींची माफी

आशिया कप विजयानंतर ट्रॉफी वाद : मोहसिन नक्वींची माफी

Cricket Match News - आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयात भारतीय संघाने पाकिस्तानच्या मस्तवाल वागणुकीला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी न देता ती स्वतः सोबत घेऊन गेले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. ही घटना केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात टीकेचा विषय ठरली. भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नक्वी थेट ती घेऊन निघून गेले.

बीसीसीआयने ही गोष्ट एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC)च्या दुबई येथे झालेल्या बैठकीत उपस्थित केली. या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वी यांनी अखेर माफी मागत आपली चूक कबूल केली आहे.  त्यांनी सांगितले, "जे घडले ते घडायला नको होते. आता नव्या सुरुवातीसाठी पुढे जायला हवे. सूर्यकुमार यादव यांनी स्वतः ट्रॉफी घेऊन जावी." असे म्हणत नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी घेण्याचे निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, या वादानंतर पाकिस्तानमध्येही नक्वी यांच्या विरोधात नाराजी वाढली आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना पीसीबी प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. नक्वी सध्या पीसीबी अध्यक्ष असून पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवतात.