कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे निलंबीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्र.क्र.02 कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते रेणुसे, रेडेकर, बडबडे मळा पर्यंत ड्रेनेज पाईप टाकणे या विकास कामाचे काम न करता बिले काढलेबाबत आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट तथा सहा.अधिक्षक बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबीत केले आहे. तर महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. तर सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सेवानिवृत्त उप - शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकौंट सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशी समितीस 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश -
या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला शनिवारी या सर्व प्रकरणाचा अहवाल सात दिवसाचे आत देण्याचे निर्देश दिले होते. परंतु प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज या चौकशी समितीला 48 तासाचे आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये जे जे अधिकारी व कर्मचारी कागदपत्राच्या व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.