कागलमध्ये श्रीराम नवमी उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
कागल (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात चालू वर्षी चैत्र गुढी पाडवा ते श्रीराम नवमी या पवित्र पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

आज प्रभू श्रीराम जयंतीनिमित्त दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने व विधीवत पार पडला. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गायन करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले.यावेळी झालेल्या महाआरतीला राजे प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत नंदितादेवी घाटगे,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेच्या चेअरमन नवोदितादेवी घाटगे, राजे विरेंद्रसिंह घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, प्रताप माने, कृष्णात पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे मंदिर परिसर पूर्णतः गजबजून गेला होता.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले,तसेच भरतनाट्यम व कथक नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले.
श्रीराम मंदिर देवस्थान जीर्णोद्धार समितीमार्फत आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीराम नाम जप, भजन, संगीतमय कार्यक्रम, सुंठवडा व प्रसाद वाटप यांचा समावेश होता.




