कोरे अभियांत्रिकीत क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

वारणानगर – तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथे २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी भव्य "गुणगौरव सोहळा २ के २५" पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कस्तुरी दीपक सावेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन उर्जा मिळाली. त्यांच्या मनोगतात म्हणाल्या की, कष्ट आणि जिद्दी शिवाय यश मिळणार नाही तसेच त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या यशासाठी आई - वडिलांना श्रेय दिले.
कार्यक्रमात विविध विभागातील खेळाडूंना अॅथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ हे होते. प्राचार्य, डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, डॉ. डी. एन. माने, डॉ. के. आय. पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता, आणि प्रितीश पाटील, जिमखाना प्रमुख यांच्या हस्ते मान्यवर खेळाडूंना गौरवण्यात आले.
या वर्षी "ओव्हरऑल चॅम्पियनशिप" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाने पटकावला. या यशामागे विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, शैक्षणिक समन्वयक प्रा. जी. एस. कांबळे, विभागीय जिमखाना समन्वयक, प्रा.एस. एम. गडवीर आणि क्रीडा मार्गदर्शक उदय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे जिमखाना समन्वयक डॉ. एस. एम. गडवीर यांनी केले. त्यांच्या परिश्रमामुळे आणि जिमखाना समितीच्या सबळ पाठिंब्यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य नियोजन व जिमखाना समितीच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
या सोहळ्याला सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, जिमखाना समितीचे सर्व विभागीय समन्वयक, क्रीडा सरचिटणीस, करण मुळीक, क्रीडा सह - सरचिटणीस, निरंजन पाटील आणि मोठ्या संख्येने उत्साही विद्यार्थी उपस्थित होते.