खेळाडूंसाठी खूशखबर ! सासने मैदानावर साकारतोय हायटेक बॅडमिंटन हॉल; ८० टक्के काम पूर्ण, मनपा आयुक्तांकडून पाहणी

खेळाडूंसाठी खूशखबर ! सासने मैदानावर साकारतोय हायटेक बॅडमिंटन हॉल; ८० टक्के काम पूर्ण, मनपा आयुक्तांकडून पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सासने मैदान येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेल्या या प्रकल्पाच्या कामाची मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सोमवारी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. उर्वरित कामे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धांसाठी ४ कोर्ट्सची सुविधा
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी किमान चार कोर्ट्सची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यापूर्वी कै. दिलीपराव देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये केवळ दोन कोर्ट्स उपलब्ध होते. आता त्यात आणखी दोन कोर्ट्सची भर घालून एकूण ४ आधुनिक कोर्ट्सचा हॉल खेळाडूंच्या सेवेत दाखल होणार आहे.

४ कोटींचा प्रकल्प, ६ महिन्यांत लोकार्पण
सुमारे ४ कोटी रुपये अंदाजपत्रकीय खर्च असलेला हा प्रकल्प मे. संगीता कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत राबवला जात आहे. सध्या कॉलम, स्लॅब, विटांचे बांधकाम, प्लास्टर आणि छतावरील पत्र्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत हे उर्वरित काम पूर्ण होऊन हॉल खेळाडूंसाठी खुला केला जाईल.

या पाहणीवेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार आणि कनिष्ठ अभियंता उमेश बागूल उपस्थित होते.