आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करा
कागल,(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या कुटुंबीयांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी.अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीच्यावतीने देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले,छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये माता- भगिनींची इज्जत राखण्याची शिकवण छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. अशी परिस्थिती असताना एखादा जबाबदार आमदार माता भगिनींच्या बाबतीमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये जाहीरपणाने बोलू शकतो, ही महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान करणारी घटना आहे.
स्व. राजाराम बापू पाटील यांच्याकडे राजकीय, सामाजिक, सहकार, कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील आदर्श नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांचाच आदर्श घेऊन आमदार जयंत पाटील साहेब हे, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गेले 30-35 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मंत्रिमंडळात विविध खात्यांची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळून राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्याबाबतीमध्ये एकेरी भाषेत उल्लेख हा राज्याच्या सुसंस्कृतपणाला अशोभनीय आहे. त्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक सुशांत कालेकर, उद्योजक सुधाकर सुळकुडे, अशोक शिरोळे, इंद्रजीत घाटगे ,प्रमोद कदम, प्रदीप खोत,हिदायत नायकवडी,विनोद परीट, गणेश पाटील, नामदेव गुरव, दिग्विजय पाटील, जयदीप पाटील,अक्षय कांबळे, आदी उपस्थित होते.




