गुरू - शिष्य परंपरेतील ज्वेलरी प्रशिक्षणाचा समारोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) - भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या हस्तकला विभागामार्फत एआरबी स्कील ट्रेनिंग सेंटर, हॉलमध्ये मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या गुरु-शिष्य हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी पारंपरिक ज्वेलरी बनवण्याचा कोर्स घेण्यात आला, याला महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
सलग दोन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान महिलांनी विविध प्रकारची पारंपरिक ज्वेलरी बनवली. आजच्या समारोप कार्यक्रमात सहभागी महिलांनी स्वतः तयार केलेले दागिने परिधान करून पारंपरिक पोशाखात हजेरी लावली. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कलाकृतींचा अभिमान स्पष्ट दिसत होता.
यावेळी महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात खण ज्वेलरी, कोल्हापुरी ठुशी, तसेच इनव्हिजीबल ज्वेलरी यांसारख्या विविध पारंपरिक व नवोन्मेषात्मक डिझाईन्सचा समावेश होता.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांना हस्तकला मंत्रालयाचे प्रमाणपत्र व प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेले टुलकीट प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्रांचे वितरण हस्तकला मंत्रालयाचे चंद्रशेखर सिंग व पल्लवी यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शन करताना सिंग यांनी महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले. तसेच सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. त्यांनी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याचा सल्ला दिला.
या समारोप सोहळ्याला आकाश मुळीक, चव्हाण, गौरव, प्रशिक्षिका प्रियांका खवरे , आणि एआरबी स्कील सेंटरचे नचिकेत भुर्के यांची उपस्थिती होती.
हा उपक्रम महिलांच्या कौशल्यविकासासाठी महत्त्वाचा ठरला असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.