गोकुळचं 'अध्यक्षपद' नको रे बाबा! सुद्रीक यांच्या नंतर धायगुडेंचाही 'नकार'अखेर प्रदीप मालगावे यांच्याकडे 'गोकुळ'ची धुरा
कोल्हापूर/ प्रतिनिधी : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून, अध्यक्षपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आले. गोकुळच्या प्रशासकीय मंडळात गेल्या काही दिवसांत वेगाने घडामोडी घडल्या असून, आतापर्यंत तब्बल तीन अध्यक्ष बदलण्याची वेळ आली आहे.

निवडणुकीपूर्वी गोकुळ दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये सर्वात आधी संजयकुमार सुद्रीक यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, गोकुळ दूध संघात उत्पादकांनी सुरू केलेली आंदोलने आणि त्यातच महिनाभरापूर्वी सुद्रीक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती.
सुद्रीक यांच्यानंतर हे पद सुनील धायगुडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. परंतु, जनगणना आणि इतर शासकीय कामांचा अतिरिक्त व्याप असल्यामुळे धायगुडे यांनीही या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. या सर्व घडामोडींनंतर अखेर सिंधुदुर्गचे उपनिबंधक म्हणून पदोन्नती मिळालेले प्रदीप मालगावे यांच्याकडे गोकुळच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या नवीन बदलांमुळे आता गोकुळचे प्रशासकीय मंडळ पाच सदस्यांवरून चार सदस्यांचे झाले आहे. संजयकुमार सुद्रीक यांना मंडळातून वगळण्यात आले असून आता अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सुनील धायगुडे, सागर बलवकडे आणि डॉ. चंद्रकांत परुळेकर असे चौघांचेच हे प्रशासकीय मंडळ असणार आहे. नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर आता गोकुळचा पुढील कारभार कसा चालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




