जालन्यातील खळबळजनक घटना; कर्जबाजारीपणातून सुटण्याचा भयानक कट; तरुणाला मारून कार पेटवली

जालन्यातील खळबळजनक घटना; कर्जबाजारीपणातून सुटण्याचा भयानक कट; तरुणाला मारून कार पेटवली

मुंबई (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा खोटा बनाव रचून एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना जालन्यात उघडकीस आली आहे. जालना पोलिसांनी अत्यंत चातुर्याने आणि सखोल तपास करत या संपूर्ण प्रकरणाचा कट उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह तिघांना गजाआड केले आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात रस्त्याच्या कडेला एका कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला होता. सुरुवातीला हा अपघात असावा असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र कारमध्ये जळालेला मृतदेह नेमका कोणाचा? याबाबत जाफराबाद पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नितीन गवळी हा मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला होता. या कर्जाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्याच मृत्यूचा खोटा बनाव रचण्याचे ठरवले. या भयंकर कटासाठी त्याने संदीप चव्हाण या निष्पाप तरुणाची निवड केली.

नितीन गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून प्रथम संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर हा अपघात आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी संदीपचा मृतदेह कारच्या ड्रायव्हर सीटवर ठेवला आणि कारला भीषण आग लावून दिली. जेणेकरून पोलिसांना आणि समाजाला कारमधील मृतदेह नितीन गवळीचाच आहे असे वाटेल आणि तो कर्जातून मुक्त होईल, असा हा सैतानी प्लॅन होता.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवले असता, नितीन गवळी हा जिवंत असल्याचे आणि हा संपूर्ण प्रकार एक पूर्वनियोजित हत्या असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एका निष्पाप तरुणाचा बळी देणाऱ्या या नराधमांच्या क्रूरतेमुळे संपूर्ण जालना जिल्हा हादरून गेला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.