डीजीसीएने VCR कंपनीवर कारवाई तर केली, रोहित पवारांनी सांगितला पुढचा प्लान!
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. हा विमान अपघात सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. डीजीसीए आणि सीआयडीकडून या अपघातप्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, डीजीसीएच्या पाच विमांनाना उड्डाणांस बंदी घालण्यात आली असल्याची माहिती डीजीसीएने दिली. डीजीसीएच्या या कारवाईनंतर आता रोहित पवारांनी मोठं पाऊल उचललं आहे. ते आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन व्हिएसआर कंपनीचे मालक, डीजीसीएचे अधिकारी, अजित पवारांना हे विमान देणारे अधिकारी आणि घातपाताचा संशय असल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. आज रोहित पवारांनी विधानभवनात प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

“अजित पवारांचा मृत्यू ज्यादिवशी झाला तो आमच्या सर्वांसाठी काळा दिवस. त्या दिवसानंतर आतापर्यंत अनेक सामान्य लोकांना प्रेमापोटी वाटतंय की दादा आज कुठेतरी बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. तशी इच्छा आमची असली तरीही आम्हा सर्वांना माहित आहे की तो दिवस दुर्दैवाने येणार नाही. जनतेची इच्छा आहे की जो घात – अपघात झाला त्याबाबत माहिती आली पाहिजे आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे. याकरता महाराष्ट्रातील सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला हे सर्व त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोणी सोशल मीडियावर, कोणी चहाच्या टपरीवर, गवत खुरपत असताना महिला एकत्र येऊन लाडकी बीहण योजना ज्यांनी आणली तेच आता राहिले नाहीत, असं बोलत आहेत. युवासुद्धा आता चर्चा करत आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम जनता लिहित आहे, वाट पाहत”, असं रोहित पवार म्हणाले.
“हा लढा लढत असताना एक ताकद एकत्रित आली, त्यामुळे आता असं जाणवायला लागलं आहे की ज्या दिशेने तपास जायला पाहिजे त्या दिशेने जात आहे. पण काही गोष्टी जाणवतात. याबाबत डीजीसीएने काल अहवाल दिला. त्या अहवालावर मी बोलेनच. पण डीजीसीएने आतापर्यंत कोणते अहवाल दिले, ते क्रमवारीने मांडेन. दोन दिवसांत मी अजून एक पत्रकार परिषद घेणार आहे. तेव्हाही अनेक गोष्टी सांगणार आहे”, असंही ते म्हणाले.




