दिवाळी पाडव्यादिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते..? जाणून घ्या सविस्तर

दिवाळी पाडव्यादिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते..? जाणून घ्या सविस्तर

मुंबई - दिवाळी हा एक पंचपर्वीय सण असून त्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, ज्याला दिवाळी पाडवा या नावानेही ओळखले जाते. हा सण लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते, आणि त्यांच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि निष्ठा यांचे स्मरण केले जाते.

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

बलिप्रतिपदा म्हणजे फक्त सण नव्हे, तर एका महान दानशूर राजाच्या स्मृतीचा दिवस आहे. या दिवशी रंगीबेरंगी रांगोळ्यांमध्ये राजा बळीची प्रतिमा रेखाटून तिची पूजा केली जाते. लोक "इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना करतात. बलिप्रतिपदा 22 ऑक्टोबर रोजी साजरी होईल.

पौराणिक पार्श्वभूमी - 

या सणाच्या मागे एक महत्त्वाची आख्यायिका आहे. बळी राजा हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र. राक्षसकुळात जन्मलेला असला तरी तो अत्यंत दानशूर, प्रजाहितदक्ष आणि सत्यप्रिय होता. त्याच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देवांचा त्रास वाढला. त्याने एक यज्ञ आयोजित केला होता, त्यात भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि तीन पावले भूमी मागितली.

राजा बळीने शब्द पाळून भूमी दान दिली. वामन रूपातील विष्णूंनी एक पाऊल स्वर्गात, दुसरे पृथ्वीवर ठेवले आणि तिसऱ्यासाठी जागा उरली नाही, तेव्हा बळीने आपले मस्तक पुढे केले. वामनाने त्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळाचा राजा बनवले. त्याच्या दानशूरतेमुळे विष्णूंनी त्याला वरदान दिले की प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला त्याची पूजा केली जाईल. या दिवशी पार्वतीने महादेवांना द्युत (जुगार) खेळात हरवले, अशीही एक आख्यायिका आहे. म्हणून काही भागांमध्ये या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते.

सतत एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर जपणाऱ्या पती - पत्नीच्या नात्याचे प्रतीक म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि तो तिला ओवाळणी देतो. या परंपरेमागे विष्णू-लक्ष्मी यांची कथा आहे. वामन अवताराची लीलाच पाहून लक्ष्मीने विष्णूचे औक्षण केले आणि त्याने तिला ओवाळणी दिली. यावरूनच ही परंपरा सुरु झाली.

दिवाळी पाडवा व्यापाऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. अनेक ठिकाणी याच दिवशी विक्रम संवत या नवीन संवत्सराची सुरुवात होते. उज्जैनच्या राजा विक्रमादित्याने शत्रूंवर विजय मिळवल्यानंतर या दिनी नवीन कालगणना सुरू केली, असे मानले जाते. त्यामुळे व्यापारी नवीन वह्यांची पूजा करून, हिशेबांचे नवीन वर्ष सुरू करतात.

बलिप्रतिपदेला शुभ मुहूर्त (22 ऑक्टोबर 2025)

पहिला मुहूर्त : सूर्योदयापासून सकाळी 9:30 पर्यंत

दुसरा मुहूर्त : सकाळी 10:56 ते दुपारी 12:23

तिसरा मुहूर्त : संध्याकाळी 4:24 ते 6:09

बलिप्रतिपदा म्हणजे परंपरा, पौराणिकता, आणि सामाजिक नात्यांची जपणूक. हा दिवस प्रेम, त्याग, निष्ठा आणि नवसंकल्पांचा आहे. दिवाळीतील दीपोत्सव, रांगोळ्या, औक्षण आणि आभार व्यक्त करण्याची ही एक सुंदर संधी आहे.