दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हापरिषदकडून 'ही' नोटीस
कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी दरवर्षी दोन वेळा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येते. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या प्री-मान्सून स्वच्छता सर्वेक्षणात अनेक ग्रामपंचायतींना स्त्रोताभोवती आढळलेल्या त्रुटींमुळे पिवळे कार्ड देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ग्रामपंचायतींना आवश्यक सुधारणा करून पिवळे व लाल कार्ड हिरव्या कार्डात रूपांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आता 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मान्सूनोत्तर स्वच्छता सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींना पुन्हा पिवळे कार्ड देण्यात आले असून त्यापैकी 35 ग्रामपंचायती एप्रिल 2025 च्या यादितही होत्या. ही पुनरावृत्ती गंभीर मानून संबंधित सरपंचांवर ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 39 नुसार कारवाई का करू नये, तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई का करू नये, अशा कारणे दाखवा नोटिसा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतींना 15 दिवसांचा अवधी देण्यात आला असून या काळात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांभोवती आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करून पिवळे कार्ड हिरव्या कार्डात रूपांतरित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत फेर सर्वेक्षण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याचे पाणी योजना - स्वच्छता सर्वेक्षण (एप्रिल 2025 व ऑक्टोबर 2025)
A. भुदरगड:
- नाधवडे
- गारगोटी
- हणबरवाडी
- मिनचे बुद्रुक
- हेदवडे
B. चंदगड:
- दाटे
- गुडेवाडी
- बुजवडे
C. गगनबावडा:
- मुटकेश्वर
D. हातकणंगले:
- रुकडी
- येळगुळ
- शिरोली पुलाची
- तूप
- भेंडवडे
E. करवीर:
- निगवे खालसा
- कुर्डू
- वडकशिवाले
- चुये
- नांदगाव
F. पन्हाळा:
- कोलिक
G. राधानगरी:
- धामोड
- बुरंबाळी
- राशिवडे बुद्रुक
- शेळेवाडी
- टिटवे
H. शिरोळ:
- अब्दुल लाट
- लाटवाडी
- शिरदवाड
- शिवनाकवाडी
- उदगाव
- कवठे बुलंद
- गौरवाड
- टाकळी
- घोसरवाड
- जुने दानवाड




