दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर देण्याची भूमिका - आ. सतेज पाटील

दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर देण्याची भूमिका - आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज सोमवार १८ ऑगस्ट रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर देण्याची भूमिका असल्याचं प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. 

यावेळी आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, गेल्या चार वर्षांत गोकुळने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका घेतली असून म्हैशीसाठी रुपये १२ व गायीसाठी रुपये ६ इतकी दरवाढ केली तर म्हैस खरेदीसाठी ५० हजार पर्यंत अनुदान योजना सुरू केली आहे. करवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. या दौऱ्यातून शेतकरी व संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. गोकुळचा ब्रँड हा म्हैस दूधाचा असून शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळावा हे आमचे ध्येय आहे. संस्थेच्या ठेवी ५१२ कोटींवर पोहोचल्या असून उलाढाल ४ हजार कोटीवर गेली आहे. मुंबईत पॅकेजिंग प्रकल्प, सोलर प्रकल्प अशा उपक्रमांमधून संस्थेची बचत होत आहे. दूध संकलन २० लाख लिटरवरून २५ लाख लिटरकडे वाटचाल करत आहे. गोकुळची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या सहकार्याने, पारदर्शक आणि काटकसरीत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हाच आमचा प्रयत्न राहील.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघाने जातिवंत म्हैस खरेदी अनुदान तसेच जातिवंत वासरू संगोपन अनुदानात वाढ केली आहे. दूध व्यवसायाच्या स्थैर्यासाठी ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. भविष्यात गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य संघामार्फत लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हिफर रेडिंग प्रोग्रॅम (एचआरपी) आणि जातिवंत म्हैस रेडी संगोपन केंद्र योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार जातिवंत जनावरे (रेडी) सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांसाठी विमा योजना, अनुदान योजना व इतर सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गोकुळच्या सेवांचा प्रभावी वापर करून दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, संघाचे गाय दूध संकलनात वाढ होत असून म्हैस दूध संकलन वाढण्याचे गरज आहे. तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधी यांनी संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधी मध्ये वाढ करावी, जातिवंत म्हैशीचे रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघाने उपलब्ध करून द्यावी तसेच सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ करावी या विषयावरती चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजी देसाई (भामटे), प्रविण पाटील (कावणे), के.डी.पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन नविद मुश्रीफ व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी जातिवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल, महालक्ष्मी फर्टीमीन प्लस मिनरल मिक्चर सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा पोहोचवल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांबद्दल गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.

यावेळी स्‍वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रस्ताविक संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी केले. तर आभार संचालक संभाजी पाटील यांनी मानले.

याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँकचे, गोकुळचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.