देवाभाऊंपुढे कोणाचंच चालत नाही; शक्तीपीठ बैठकीत शेतकऱ्याची रणजितसिंह मोहिते-पाटलांना टोलेबाजी
मुंबई (प्रतिनिधी) : शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाइनमेंट माळशिरस तालुक्यातून गेल्यानंतर आता या भागातील राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला आहे. या महामार्गाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विकासकामांवरून होणारे गैरसमज दूर करतानाच, एका शेतकऱ्याने थेट 'देवाभाऊपुढे कोणाचंच काही चालत नाही', असे विधान केल्याने बैठकीत एकच हशा पिकला.

अकलूज येथील या बैठकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गासारख्या मोठ्या विकासकामांबद्दल समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत, ते आधी समजून घेतले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. महामार्गामुळे होणारा विकास आणि जमिनींचा मोबदला यावर चर्चा सुरू असतानाच, बैठकीत उपस्थित असलेल्या एका शेतकऱ्याने उभे राहून थेट मनातील खंत आणि वास्तव बोलून दाखवले.
त्या शेतकऱ्याने रणजितसिंह मोहिते पाटलांकडे पाहत एक टिप्पणी केली. तो म्हणाला, "देवाभाऊपुढे आणि या सरकारपुढे कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही आता हा रस्ता इथून न्यायचाच ठरवलाय, तर काही हरकत नाही. पण चांगल्या जमिनी आहेत. मार्ग काहीतरी काढा, असे त्याने म्हटले. शेतकऱ्याच्या या थेट आणि रोखठोक विधानानंतर बैठकीत एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. भूमीपुत्रांनी या महामार्गाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र, अशा परिस्थितीत अकलूजच्या बैठकीत शेतकऱ्याने देवाभाऊ पुढे काहीच चालत नाही, असे विधान करत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दाखवले की काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.




