नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, मुख्यमंत्री सखोल तपास करणार

नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, मुख्यमंत्री सखोल तपास करणार

बीड (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती विधानसभेतील काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज 94 वा नारळी सप्ताह पार पडत आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आले असता, त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. तसेच, नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेला प्रकार गंभीर असून सखोल चौकशी करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नाशिकमध्ये बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, अशी एक भयानक 'मोडस ऑपरेंडी' येथे राबवली जात असल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, लैंगिक अत्याचारा 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटकही झाले आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील याप्रकरणी भाष्य केलं. 

नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीला आणलेलं आयटी कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे, एखाद्या टेक्निकल कंपनीमधे अशाप्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे. या सगळ्याचा तपास सखोल केला जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले.