पंतप्रधानपदाच्या शर्यतीत योगी आदित्यनाथ? 2029 च्या चर्चेवर यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत योगी आदित्यनाथ? 2029 च्या चर्चेवर यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन

लखनऊ : देशाच्या राजकारणात सध्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीची आणि भाजपच्या भावी नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळानंतर भाजपचा पुढील पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर सातत्याने अंदाज बांधले जात आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. या पार्श्वभूमीवर, योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'द स्टेट्समॅन' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आणि 2029 मधील पंतप्रधानपदाच्या दाव्यावर थेट उत्तर दिले.

'दिल्ली नाही, उत्तर प्रदेशची सेवा हीच पहिली प्राथमिकता'

मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले की, "2027 नंतर तुमच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेची चर्चा होते. तुम्ही स्वतःला भविष्यातील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहता की यूपी हीच तुमची कर्मभूमी राहील?"

 

यावर उत्तर देताना योगी म्हणाले, "मी जबाबदारीच्या भावनेने सार्वजनिक जीवनात आलो आहे. 'राष्ट्र प्रथम' हे माझे अंतिम तत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाने माझ्यावर उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मी हा माझा मोठा सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी मानतो. सध्या माझे सर्व लक्ष राज्याला आर्थिक, सामाजिक आणि सुशासनाच्या मार्गावर पुढे नेण्यावरच केंद्रित आहे."

 

योगी यांच्या या उत्तरातून त्यांनी तूर्तास राष्ट्रीय राजकारणापेक्षा उत्तर प्रदेशच्या विकासालाच प्राधान्य असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.



जात-पातीचे गणित आणि विरोधाकांचे 'PDA' कार्ड

2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीने 'PDA' (पछाडे, दलित, अल्पसंख्याक) सूत्रावर भर दिला आहे. 2024 च्या लोकसभा निकालांनंतर भाजप जातीचे गणित कसे सावरणार, असा प्रश्न योगींना विचारण्यात आला.

 

यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले:

  • लोकांचा अनुभव महत्त्वाचा: निवडणुका केवळ समीकरणांवर नाही, तर सुशासन आणि जनतेला मिळणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवावर ठरतात.

  • मागास आणि दलितांची साथ: 2017 आणि 2022 च्या निवडणुकांमध्ये ओबीसी आणि दलित समाजाने भाजपला पूर्ण पाठिंबा दिला, कारण योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकांपर्यंत पोहोचला.

  • 'लाभार्थी' हाच आमचा वर्ग: "लाभार्थ्याला कोणतीही जात नसते. लाभार्थी हा असा एक वर्ग आहे जो जात-पातीच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार करतो. हेच आमचे गणित आणि हेच आमचे रसायन (केमिस्ट्री) आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.