पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग
मुंबई (प्रतिनिधी) : राजस्थानमधील बालोत्रा येथील पाचपद्रा रिफायनरीच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी आग लागली. आज 20 एप्रिल सोमवारी दुपारी 2 वाजता रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटला (सीडीयू) आग लागली. धूर निघू लागताच कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नुकसानीचे प्रमाण आणि आगीच्या कारणांचे मूल्यांकन केले जाईल. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडक पहारा ठेवण्यात आला आहे. पाइपलाइनद्वारे पुरवठा होणारे कच्चे तेल या युनिटमध्ये येते. येथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करून ते इतर विविध युनिट्सकडे पाठवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी पाचपद्रा रिफायनरीचे उद्घाटन करणार आहेत. रिफायनरीचा ज्या भागात आग लागली, तो भाग पंतप्रधान मोदी उद्या ज्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत, त्या ठिकाणापासून 800 मीटर अंतरावर आहे.
पंतप्रधान मोदींची सभा उद्या होणार असून, ती आगीच्या ठिकाणापासून अवघ्या 800 मीटर अंतरावर आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. रिफायनरीमधील कर्मचारी कांचन कुमार म्हणाले, "आग लागल्यानंतर सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. कोणताही कामगार जखमी झाला नाही."
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी X वर लिहिले की, "बालोत्रा जिल्ह्यातील पाचपद्रा येथील रिफायनरीला आग लागल्याचे ऐकून मला चिंता वाटत आहे. ही रिफायनरी सर्व राजस्थानी लोकांसाठी अभिमानाचा प्रकल्प असून, तिचे उद्घाटन उद्या होणार आहे. अशा वेळी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सामील असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो."




