पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील यांना “सरपंच अवॉर्ड” प्रदान

पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील यांना “सरपंच अवॉर्ड” प्रदान

पाचगाव (प्रतिनिधी) -  पाचगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील यांना ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल "सरपंच अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. ‘पुढारी’ ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात ग्रामविकास मंत्री  जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

ग्रामविकासाची परंपरा पुढे नेत, गोपाळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे राबवली होती. त्याच धर्तीवर सध्याच्या सरपंच प्रियांका पाटील यांनीही गावाचा चेहरा - मोहरा बदलवणारी अनेक लोकोपयोगी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली.

यामध्ये जलसंधारण, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, महिला सबलीकरण, डिजिटल ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रांमध्ये सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत ग्रामविकासाचा नवा आदर्श घालून दिला. त्यांच्या पुढाकाराने गावात विकासात्मक घडामोडींना गती मिळाली असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सरपंच प्रियांका पाटील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलशी बोलताना म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थांचे, सदस्यांच्या पाठबळ आणि एकत्रित प्रयत्नांची पोचपावती आहे, असे सांगून "यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहून, राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

या सन्मानसोहळ्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.