पाच वर्षाच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना योग्य पदवी प्रदान करावी - युवासेनेची विद्यापीठाकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सन २०२० - २१ एम. एस. सी. ई. टी सेलमार्फत पाच वर्षाच्या बी.एस.एल. एल. बी डिग्री साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बॅचलर ऑफ लॉ जनरल ही पदवी जी तीन वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते, तीच दिली गेली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ परिपत्रक क्रमांक १३४६ मध्ये सन २०२४ - २५ पासून विद्यार्थ्यांना पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी बीएससी एलएलबी अशा देण्यात येणाऱ्या डिग्रीचे नामांतरण बीए एलएलबी असे करण्यात आले आहे.
पण सन 2020 - 21 च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशावेळी नमूद केलेली बीएससी एलएलबी, अथवा आत्ता बदललेली बीए एलएलबी यापैकी कोणतीच डिग्री न देता बॅचलर ऑफ लॉ जनरल ही पदवी देण्यात आली आहे. ज्यामुळे पाच वर्ष विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे मूल्य शून्य ठरत असून त्यांना अतिरिक्त पात्रता म्हणून बीएसएल पदवी मिळणे आवश्यक होते. ही पदवी नसल्यामुळे पुढे वकील म्हणून नोंद करताना अनावश्यक चौकशी किंवा अपात्र होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असं मत शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेनं व्यक्त केल असून युवासेनेने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या सोबत या विषयावर चर्चा केली.
यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन, या विषयावर सन्मानजनक तोडगा काढून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी प्र - कुलगुरू डॉ. पी. एस पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ॲड. चेतन शिंदे, अविनाश कामते, सौरभ कुलकर्णी, नम्रता भोसले, विपुल भंडारे, यश गुजर, अभिषेक देवकर, सत्वशील माने, आदित्य आरेकर, हर्षदा पोर्लेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.